Thursday, May 27, 2010

' एक अंत आत '

एक अंत आत ' म्हणजे एकांत.. आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो... बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो हे न पचणारे न पटणारे तथ्य...
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त एकांत...

एकांत चांगला की वाईट?? यावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असु शकते... पण तो सर्वांना हवा असतो हेही तितकेच खरे... कधी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्रास देणारे क्षण विसरण्यासाठी... आयुष्यातली न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी...तर कधी सार्‍याचाच कंटाळा येऊन फक्त आणि फक्त एकट राहण्यासाठी.. अश्या असंख्य कारणांसाठी प्रत्येकाला एकांत हवा असतो...भारताची लोकसंख्या पाहिली तर अशी किती कारण असतील याचा विचार न केलेलाच बरा नाहीतर त्यासाठी सुद्धा एकांत शोधावा लागेल...

जेव्हा कधी आपल्याला वाटेल की एखादी आपल्या जवळची व्यक्ती दु:खी आहे त्यावेळी तिला एकटे राहू द्या... तो अनुभव त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो सांत्वन करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थोडासा वेळ देणे जास्त योग्य... एकांत आणि एकाकिपणा यात खूप फरक आहे... वपूंच्या भाषेत सांगायचे तर 'एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. जेव्हा कधी दु:ख होईल तेव्हा एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलका होशील. वर चढशील, आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम, 'तुका आकाशाएवढा' असं लिहून गेला असेल.’

आयुष्य जगताना खूप खाचखळगे होते, असणार आणि कायम राहणार...चालताचालता लागलं तर कोणी चालणे सोडत नाही.... आयुष्यात जवळचे कोणी गेले तर कोणी जगणे सोडत नाही.. तसेच कोणी बरोबर असो वा नसो एकांत हा सुद्धा कोणीच सोडू शकत नाही...

एकदा असच एकट बसून विचार करत होतो ...आपण काय कमावले आणि काय गमावले याचा... मग आठवेल की किती दिवस आपण गाभूळलेल्या चिंचा खाल्या नाहीत.. आकाशात उडणार्‍या पक्षाकडे एकटक पाहिले नाही... जत्रेत मिळणारी शिट्टी वाजवली नाही... रात्री अंगणात झोपून काळ्याकुटट आकाश्यातल्या चांदण्या मोजल्या नाहीत... कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म आता उरला नाही... ती उडू शकते कारण तिचे पंख तिने कधीच बांधले नाही.. आपण मात्र अजूनही आपले पंख बांधून उडण्याचा प्रयत्न करतोय...मनसोक्त हसण्यासाठी सुद्धा आपल्याला लोक काय बोलतील याचा विचार करतो.. लहानपण देगा देवा हे वाक्य अजूनही हवेहवेसे वाटते ते या कारणांमुळेच...

'एकांत' इतर अनुभवांसारखाच हा सुद्धा एक प्रकृतीचा आणि मनाचा भाग आहे आणि तो फक्त अनुभवायचा कधी दु:खात तर कधी सुखातही...

Tuesday, May 18, 2010

अपेक्षांचे ओझे

"सर्वच क्षेत्रांत स्पर्धा असल्याने मुलांवर ताण येतो. अशा वेळी मुलांशी मैत्री करा; त्यांना समजून घ्या. त्यांच्या अडचणी जाणून घ्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका,' अशी कळकळीची विनंती आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांनी समाजाला केली आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी आपणही समाजाचे; आई-वडिलांचे काही देणे लागतो, याचे भान ठेवा, असे मनःपूर्वक आवाहन त्यांनी केले आहे -
वृत्तपत्र - ई-सकाळ

पालक आणि मुले यांच्यातली दरी आणखी खोल खोल होत चालली आहे का??.. असा प्रश्न निर्माण करणारा हा लेख....

एखादे अपत्य जन्माला आले की त्याबरोबर अजून एका गोष्टीचा जन्म होतो आणि तो म्हणजे ' अपेक्षा ' या लहान वाटणार्‍या शब्दाचा...
लहान असताना मुलाच्या तोंडी पहिला शब्द असतो तो 'अ'.. पण मुलाने 'अ'पेक्षा जास्त बोलावे साठी प्रयत्न सुरू होतात... मग त्याला काका, मामा, दादा, मावशी असे शब्द बोलायला शिकवले जाते... आणि ते तो बोलू लागला की अजून बरेच शब्द (जे त्याला त्या वयात शक्य होऊ शकत नाही ते सुद्धा) त्याला शिकवण्याचा अट्टहास केला जातो....मूल जसजसे मोठे होत जाते तसेच अपेक्षेचे शेपूट वाढत वाढत जाते...
आपला मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही हे दाखवण्यासाठी नकळत आपण त्याच्यावर मोठे ओझे टाकून मोकळे होतो (मी नकळत असे म्हटले आहे) काही मुलांनी जरी हे कर्तव्य म्हणून स्वीकारले असले तरी तुरुंगवास भोगत असल्याचा भास बाकीच्या असंख्य मुलांना होत असतो...

मान्य आहे की जन्मदात्यांचा अधिकार मुलांवर त्यांच्यापेक्षा अधिक असतो आणि हे आजची तरुण पिढी जाणून आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर निर्बंध लादण्याची गरज आहे का???.... हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.

बर्‍याचवेळा नातेवाईकांकडून 'तुमच्या आईवडिलांनी स्वतंत्रपणे किती कष्ट करून हे सार तुमच्यासाठी उभे केले आहे' हे विधान सारखे सारखे ऐकवले जाते पण समजा तेच स्वातंत्र्य मुलाला एकदा दिले तर???
जेव्हा जेव्हा मुले चुकतात तेव्हा त्याची जाणीव त्यांना करून देणे ह्यात काहीच वावगं नाही पण त्यांच्या प्रयत्नांना खतपाणी घालण्याचे काम मोठ्यांनीच केले पाहिजे आणि त्याचा फायदा पालक आणि मूल या दोघांना होऊ शकतो...

सध्यातरी माझ्या मते मुंबईमध्ये ७० ते ७५ टक्के आईवडिलांच्या काही अपेक्षा तंतोतंत जुळत असतील
त्यातली एक म्हणजे आपली मुले इतरांपेक्षा ग्रेट असावीत...
आणि दुसरी म्हणजे आपण विवाहासाठी ठरवलेले स्थळ हेच त्यांच्यासाठी योग्य आहे आणि तोच त्यांनी मानावा...

पहिली अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वच मुले प्रयत्न करतात कारण तिकडे प्रश्न असतो तो फक्त मेंदूला चालना देण्याचा (आणि कधीकधी स्वार्थीपणाचाही)
पण दुसरी अपेक्षा पूर्ण करताना कोणी क्लिन बोल्ड होतो तर कोणी रन आऊट कारण इकडे ना मेंदू चालतो ना शहाणपणा.. असतो तो फक्त आणि फक्त वेडेपणा... यावेळी शरीराला, मेंदूला आणि बहुदा आत्म्याला सुद्धा मनानेच काबीज केलेले असते आणि या वेडेपणामध्येच आपण कबुलीजबाब आईवडिलांना देतो...त्यांच्यासाठी मात्र तो अपेक्षभंगाचा झटकाच असतो...
त्यांना तो सहन होत नाही मग लगेचच मुलांना न विचारता बाकीची जुळवाजुळव सुरू होते.. मुलांच्या विरोधात जाऊन त्यांची मते न जाणता लग्न ठरवले जाते... यावेळी मुलाच्या मनात काय चालले आहे... त्याचा होकार नकार याला काहीच महत्व दिले जात नाही..अशावेळी मुलांसाठी हा अपेक्षभंगाचा झटका असु शकत नाही का??
आपल्या मुलाने/ मुलीने पाहिलेले स्थळ सारा विचार करून पाहिले असेल असे मोठ्यांना अजिबात वाटत नाही का??.. की त्यांना असे वाटूनच घ्यायचे नाही?

मुलांवर विश्वास टाकून जर त्यांची मने जिंकता आली तर त्यांच्या मनातला मोठ्यांविषयी असणारा आदर अजून खूप पटीने वाढेल यात तीळमात्र शंका नाही...जनरेशन गॅप मधला फरक जाणून घेऊन एकमेकांना समजून आणि जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने (मोठ्यांनी आणि तरुणपिढीने सुद्धा) मनात बिंबवण्याची गरज आहे आणि ती यापुढेही राहीलच...

अपेक्षाभंग, आत्महत्या, भांडणतंटा, घटस्फोट, मानसिक त्रास, दु:ख, क्लेश या आणि अशा गोष्टींचे ओझे कमी करायचे असेल तर एक आणि एकाच उपाय आहे तो म्हणजे समोर असणार्‍या व्यक्तीच्या डोक्यावरचे 'अपेक्षांचे ओझे' रिक्त करणे...

Thursday, May 13, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-४

बाबा आपल्याला ते कोण आहे हे फोडणी करून समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सार काही समजल्यासारखे मान डूलवतो... पण आपल्याला काहीच समजले नाही हे आपल्याला आणि बहुदा बाबांनासुद्धा माहीत असते...













दोनचार घरे सोडून आता आपला वाडा दिसू लागतो... वाडा दिसताच आपण आईचा हात सोडून धावत धावत त्या दिशिने पळतो...दारातच तुळशीला पाणी घालणार्‍या आपल्या आजीला त्याच वेगाने घट्ट बिलगतो... 'आलास कारं माझ्या लेकरा' अश्या आर्त आवाजात आजी आपल्याला मिठीत घेते...मन भरेपर्यन्त मुके घेते...सार्‍याना एकत्र पाहून नकळत तिचे डोळे भरतात.. आजोबा देवघरात देवाची पूजा करत असतात....आपल्याला पाहून ते मंत्र बोलत बोलत स्मित हास्य करतात... पूर्ण वाड्याकडे नजर फिरवून आपण मागच्या बाजूच्या अंगणात जातो.... तिकडे असलेले जांभूळ आणि पेरूच्या झाडाला किती फळ लागली आहेत हे आपण पाहून घेतो... मागच्या अंगणातच हातपाय धुवून आपण पुन्हा देवघरात आजोबांकडे जातो... देवाला लावलेले गंध ते आपल्याला सुद्धा लावतात.... आणि पाठीवरुन हात फिरवतात....

थंडी वाजत असल्याने सारे आंघोळीच्या बंबाजवळ जाउन हात शेकत बसतात.... पाणी गरम झाल्यावर आई एकेकाला पाणी काढून देते..... एका बादलीत आपण आणि काकाचा एक मुलगा असे एकत्र आंघोळीला बसतो..... एकमेकांना भिजवत मजा घेत घेत आंघोळीचा कार्यक्रम शेवटी आटपतो.... आई आपल्याला कपडे घालून केसाचा भांग पाडून तयार करते.... नाष्ट्या मध्ये मुंबईवरुन आणलेले काही खाण्यापेक्षा आजीच्या हातची शेवयांची खीर, शिरा यावर सारी सेना तुटून पडते....

Tuesday, May 11, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-३

लालसर मातीचा गंध मनात दरवळतो... पायवाटेला खेटून उभी असलेली झाडी आणि हवेतला गारवा सार सार हवहवसं वाटणार.... ....आंब्याच्या झाडावरून कोकिळेचे मधुर स्वर.....चिंचेची उंच उंच झाडे एकापाठोपाठ एक दिसू लागतात....
बाजूलाच दूरवर पसरलेल्या शेताकडे नजर जाते आणि सोनेरी पिवळी कणसे आपल्या येण्याने आनंदित होऊन डोलतात की काय असा भास होतो.... आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्‍या पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही....
त्या तोडण्याचा मोह ' आपण नंतर येऊन तोडूया ' असा विचार करून त्या क्षणी का होईना आवरतो...

गावाच्या जवळच असणारी विहीर आता दिसू लागते... तिकडे पाणी भरणारे गावकरी आपल्याकडे पाहत असतात... त्यांच्याकडून आईवडिलांची विचारपूस सुरू होते... आई वडील त्यांच्याबरोबर बोलताना आपण लगबगीने विहिरीत डोकवतो.... हिरव्या पाण्यात आपलेच प्रतिबिंब न्याहाळताना हरवून जातो....विहिरित डोकावताना ' ओओओ ' असा जोरजोरात आवाज करतो...तेव्हा काही सेकंदाताच आपलाच आवाज पुन्हा आपल्याला येतो... काहीतरी जादुच होते आहे की काय?..असे मनात येते.... एकदाच ओरडलो तरी आवाज ३ वेळा कसा येतो हे जाणण्यासाठी पुन्हा आवाज करतो.... कान विहिरिला लावून पुन्हा पुन्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.... आईचे बोलून झाले की तिचा हात धरून पुढे निघतो....

गावातील ओळखीचे चेहेरे आता दिसू लागतात...गावात येताच समोरच मंदिर दिसते.. मंदिरासमोर मोठे वडाचे झाड ... त्याच्या पारंब्याना बिलगुन खेळणारे चिमूरडी मुले आणि सावलीत कट्यावर वृतपत्र वाचत बसलेली आजोबांच्या वयाची मंडळी...' राम राम पाव्हनं..कसं काय चाललाय??...' आई बाबांना पाहून प्रत्येकजन आमची खुशालि जाणून घेतो.... त्यातलेच कोणी आजोबा मग आपले गालगुच्चे घेतात आपण पण ओळख असल्यासारखे आईच्या पदरामागे लपून लाजत लाजत त्याना स्मित हास्य देतो... पण पुढे गेल्यावर ते कोण होते??? मी त्यांचा कोण लागतो??? ते कुठे राहतात?? असा प्रश्नांचा वर्षाव आपण बाबावर करतो .... बाबा आपल्याला ते कोण आहे हे फोडणी करून समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सार काही समजल्यासारखे मान डूलवतो... पण आपल्याला काहीच समजले नाही हे आपल्याला आणि बहुदा बाबांनासुद्धा माहीत असते...

क्रमश:

Friday, May 7, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-२

सकाळी थंड वार्‍याची झुळुक अंगावर शहारा आणते... गाढ झोपेत असलेलो आपण स्वतः जागे होऊन खिडकीतून बाहेर डोकवू लागतो. आजूबाजूला पडलेले धुके आणि त्यातून पूसटशी दिसणारी हिरवीगार झाडी असा नयनरम्य परिसर पाहून डोळे दिपून जातात.

गाडी स्थानकावर येऊन थांबते... बाबा आवाज देतात बेटा चला उतरायचे आहे... पुन्हा खेळण्यांची बॅग हातात घेऊन आपण खाली उतरतो... बस स्थानकावरच्या हॉटेल मध्ये बाबा घेऊन जातात... कोण कोण काय काय खाणार??? असे विचारताच एक एकाची फर्माईश सुरू होते.... कोणाला गरमागरम भजी हवी असते...कोणाला बटाटा वडे, समोसे...तर कोणी मिसळ वर ताव मारतो...सर्व खाऊन झाल्यावर गरमागरम कटिंग चहा पिऊन सारे तृप्त होतात...

त्यापुढचा प्रवास जीपने होणार असतो... जवळजवळ १२/१३ माणसे असूनसुद्धा त्याचा ड्राइवर जायला तयार नसतो.... साहेब अजुन ४ सीट होऊदेत मग हलवतो गाडी... गाडी म्हणजे जणू कोंबड्यांचा खुराडा होऊन जातो... अजुन ४ सीट बोलून ६ जण गाडीवर स्वार होतात... ड्राइवर गाडीच्या अर्धा बाहेर जाउन गाडी कसा चालवतो हे त्याचे त्यालाच माहीत... कच्या रस्त्यावरून जाताना गाडीपेक्षा माणसाचेच पार्ट जास्त हलतात....या सार्‍या गर्दीमध्ये आपले लक्ष मात्र बाहेरच असते... गावाकडची वाट आपल्याला साद घालत असते.... आंब्याची, चिंचाची झाडे दिसायला हळूहळू सुरूवात झालेली असते... या पुढच्या २० मिनिटांच्या प्रवासात आपण विचारण्याच्या आतच आई आपल्याला 'आता आलेच हा आपले गाव' असे कमीत कमी १०/२० वेळा बोलून मोकळी होते...

गाडी गावच्या फाटकापाशी येऊन थांबते... बाहेर येताच आपण २ मिनिटांच्या अंतरावर वसलेल्या आपल्या छोट्याश्या गावाकडे हसरी नजर फिरवतो.... गावातले मंदिर आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा, जुनी कौलारु घरे, आणि लालसर मातीत न्हाहून निघालेली पायवाट, हिरवी पिवळी झाडे....सारे सारे आपल्या स्वागतासाठी सजले आहेत की काय असा भास होतो...

क्रमश:

Thursday, May 6, 2010

चला चला गावाकडे पळा...भाग-१

उन्हाळ्याच्या सुट्टी लागली रे लागली की .....ह्युरे चला चला गावाकडे पळा....बालपणीचा हा आनंद आजही तितकाच ताजा आणि सच्चा वाटतो.... आपण कितीही मोठे झालो ना तरीही त्या आठवणी अजुनही तश्याच्या तश्या मनाच्या कोपर्‍यात घर करून असतात...असेच काही क्षण माझ्या आठवणीतले... कदाचित ते तुम्हाला तुमचेही वाटतील...

बाबांनी तिकीट बुक केले हे समजताच बॅग भरायला सुरूवात होते.. सापशीडी, बॅटबॉल, छोट्या छोट्या गाड्या, भातुकलीची खेळणी सार काही जमवायला लागतो आपण... कपड्यांची बॅग कोणाकडे ही असू देत पण खेळण्यांची बॅग मात्र आपल्याला आपल्याच हातात हवी असते... काका मामा ची मुले आपल्या बरोबर येणार यामुळे आपली स्वारी जास्तच खुशीत असते....

एसटी स्टॅंड ला जावुन उभे राहीले की, 'बाबा आली का गाडी' हा प्रश्न कमीत कमी ५० वेळा विचारून होतो...गाडी आली की धावत धावत जाउन खिडकी पकडायची....गाडी कधी चालू होते यासाठी ड्रायव्हर कधी येतो याकडेही बारीक लक्ष असते...

गाडी चालू झाली की आपल्या जिवात जीव येतो... रस्त्यावरची उलटी पळणारी घरे, दुकाने पाहून खूप गंमत वाटते....
रात्रीचा प्रवास म्हणजे त्यावेळी एक पर्वणीच असते....गाडीने मुंबई सोडली की आई लगेच आपल्या अंगावर स्वेटर चढवते.. बाहेर पाहणारे आपण आता नकळत हळूहळू डुलकी खावू लागतो.... आईच्या कुशीत झोप कधी येते समजत पण नाही...

बेटा उठा उठा ... बघ बघ घाट आलाय... आपण लगेच डोळे चोळत चोळत बाहेर पाहतो.... बाहेरचा परिसर पाहून आपण हे सारे आवाक होऊन पाहत असतो....सोन्याची दुनिया असल्याचा भास असतो तो...कोणता तरी उत्सव आहे का हा??? क्षणभर प्रश्न पडतो मनाला... चारही दिशा काळोखाने भरलेल्या, आकाश नीर्भ्र आणि मध्येच खोलवर पिवळी पिवळी तोरणे जी लांब लांब पसरलेली दिसतात... थोड्याच वेळात पुढे बोगदा येतो त्यातून जाताना आपण जमिनिखालून जातोय की काय असाच काहीसा अनुभव येतो... बोगदा संपला तरी मागे वळून वळून तो दिसत नाही तो पर्यंत त्याला न्याहाळत राहतो...

सारा सारा आनंद डोळ्यात सामावून स्मित हास्य घेऊन पुन्हा आपण आईच्या कुशीत निजतो... नेहेमी तहान भूक लागल्यावर रडणारे आपले पिल्लु सार सार विसरून शांत झोपलेले पाहून आई मिठीत घेऊन गोड गोड मुका घेते....

क्रमश:

Wednesday, May 5, 2010

सामान्य माणूस...

दादर..दादर... बांद्रा जाएगा...सायन ला सोडले तरी चालेल..... अरे यार अंधेरी नही तो पार्ले तक छोड दो....
नही साब वहा पे ट्रॅफिक बहुत है.. मैं अभी खाना खाने जा रहा हूँ... ३०० रुपये होंगे मीटर से नही आउन्गा....
टॅक्सी टॅक्सी.. अबे साले सुनते भी नही, ये हमारे लिये है या हम इनके लिये... दिमाग की दही करते है....
या सर्वाना पोकळ बांबुचे फटके द्यायला पाहिजेत... बाकी वेळी ठीक आहे पण अशा वेळी तरी यांनी ऐकले पाहिजे ना...
नाहीतर काय.... अहो आमच्या सोसायटी मध्ये चला बोलले की लगेच थोबाड वाकडी करतात ही लोक.....
टॅक्सीवाले, ऑटोरिक्षा वाले आणि सामान्यमाणूस यांच्यातली खडाजंगी...

कालच्या दिवसात एक एक संभाषण ऐकण्यासारखे होते... जितके हसायला येत होते त्यावेळी तितकेच डोक्यात विचार चक्र जोरजोरात फिरत होते... हा त्रास तसा नेहेमीचाच आहे... पण जेव्हा कधी आपत्कालीन स्थिती निर्माण होते तेव्हा त्याची जाणीव अधिक प्रमाणात होते... मग त्यावर सोल्यूशन नाहीच नाही हे लक्षात आल्यावर आपण एकटेच बडबडतो किंवा समोर जो कोणी असेल ( आपली आवडती व्यक्ती असेल तिलाही फुकट आणि तिच्या मनात नसताना सुद्धा ) तिला हे सर्व ऐकवतो... कधी कधी हा राग इतका अनावर होतो की एकाचा राग दुसर्‍यावर निघतो ( बिचारा त्याची चुकी नसताना सुद्धा )... आणि आपण मगाशी का रागावलो हा विचार करून पुन्हा आपण स्वत:वर चिडतो.....फाइनली पच्याताप करण्याची पाळी आपल्यावर येते...

एकूण काय आपण क्रांती आणण्याचा फक्त आणि फक्त विचार करू शकतो .... आणि समजा जर आणण्याचा प्रयत्न केला तर समोरचा आपल्याला वेड्यात काढतो... आपल्याला कोणी वेडा बोलला हे आपल्याला कसे चालणार बरे???.... म्हणून आपण सुद्धा असल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो... कधी कोणी चुकीचे वागतोय हे समजल्यावर मनातल्या मनात समोरच्यावर चिडतो..त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहतो... आणि काही करू शकणार नाही हे समजल्यावर काही झालेच नाही असे समजून सार काही विसरून जातो....

राजकीय पक्ष तर घडाळ्याच्या काट्यापेक्षा फास्ट....एका एका मिनिटांनी शब्द बदलतात (पक्ष बदलल्याप्रमाणे)....माझ्यामते आपण बहुदा त्यांच्यापेक्षा फास्ट आहोत ते जितक्या लवकर निर्णय बदलतात ना आपण तितक्या लवकर मनातल्या मनात पलटी मारतो आणि पुन्हा समोर जो कोणी असेल त्याला (ज्याला या कशातच इण्टरेस्ट नसतो त्याला) हे होणारच होते मला माहीत होते असे बोलून स्वत: ला सर्वांसमोर मिरवतो.. आणि त्यातच आनंद मानतो... तसे पण सध्या या कन्न्डीशन ला बिचारा सामान्य माणूस इतकेच करू शकतो....

Tuesday, May 4, 2010

चक्का जाम

मोटरमेनच्या 'उपाशी' आंदोलनामुळे मुंबई बेशुद्ध
लाखो लोक रस्त्यावर
ना लोकल... ना रिक्षा... ना बस...
मोटरमन संपामुळे प्रवाशांचे हाल
दिलासा 'एनएमएमटी'च्या १०० बसचा!
मध्य-पश्चिम-हार्बर रेल्वेसेवा ठप्प!
संपामुळे मुंबईच्या 'लोकल'ची रखडपट्टी
मुंबईच्या लोकलला लागणार 'उपासा'चा ब्रेक!
अत्यावश्यक असेल तरच प्रवास करा!
प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त १०० बस
बेस्ट, रेल्वे, मोनो, मेट्रोसाठी एकच तिकीट

एका दिवसात इतक्या हेडलाइन्स (सॉरी ब्रेकिंग न्यूज़) बापरे!!!!!!!!!
आंदोलनात कोण कोण बेशुद्ध पडले माहीत नाही पण हे वाचून माझे डोके तर नक्कीच गरगरु लागले आहे. पहिली गोष्ट म्हणजे आंदोलन नक्की का चालू आहे हेच नीट माहीत नसल्याने मी तरी या रेल्वे कर्मचार्यांना नको नको ते बोलून झालो होतो.
(इन शॉर्ट शिव्या देऊन झालो होतो) आज सकाळीच वाचले मी की, ' मोटरमन संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सहाव्या वेतन आयोगाने मोटरमनचा ग्रेड पे वाढवावा, अशी शिफारस केलेली आहे. ग्रेड पे ४२०० रुपयांवरून ४८०० रुपये करण्याची मागणी आहे. ग्रेड पे वाढवल्याने रेल्वेवर फार मोठा बोजा पडणार नाही. किलोमीटर अलाऊन्स वाढवण्याचीही मागणी आहे. त्याशिवाय मोटरमनसोबत सहायक मोटरमन देण्याची मागणी आहे.'

ह्म्म्म्म... तर असे आहे सर्व.... यांच्या मागण्या सरकार ने ऐकल्या का कधी??... त्यावर काही तोडगा काढला का कधी ???.... पण या मागण्या पूर्ण केल्या नंतर पुन्हा ह्यानी अजुन नवीन मागण्या घातल्या तर??...
एका प्रश्नाचे उत्तर मिळाले की नवीन प्रश्न..... माणसाची सर्वात जवळची सवय किंवा खोड म्हणा... आणि मीही त्यातलाच एक...

रस्त्यावर ट्रॅफिक जॅम, मोबाइलचे नेटवर्क जॅम, गरमिने माणूस जॅम या सार्‍या त्रासाने माणसाचे डोके जॅम
मी काय लिहितोय याचा मेळ बसत नाही कारण सध्या परिस्थिती तशीच आहे...डोक्यात विचारांचे अणू रेणू तयार झाले आहेत
आणि चक्रिवादळासारखे घोन्गावत आहेत इकडून तिकडे....


कालपर्यंत रेल्वेच्या पाठीशी उभी असणारी काही राजकीय मंडळी आज बाहेर पडली आहेत आणि लोकांना वेठीस धरू नका असे सांगत आहेत... बिचारे रेल्वे वाले ना घर के ना घाट के अशी परिस्थिती झाली असेल त्यांची... काही नेत्यांचे वेगळे चालू आहे की आंदोलन बंद करा नाहीतर आम्ही आमचे आंदोलन करू... आधीच लोकांच्या डोक्यात तांडव चालू आहे त्यात तुमची मारामारी कशाला रे.... काय रे देवा...

आज दुसरा दिवस तरीही संप चालूच आहे कधी संपणार वाट पाहतोय...कसाबला काय शिक्षा होणार याची सुद्धा वाट पाहतोय... डोक्यामध्ये याशिवाय कामाचे वादळ गोल गोल गुमवते आहे याचा मात्र फक्त आणि फक्त त्रास होतोय...

Monday, February 1, 2010

भक्ति

आज अंगारकी सिद्धीविनायक मंदिरासमोर प्रचंड रांग लागली आहे... त्याचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी प्रत्येकाची होणारी धावपळ आणि मनाची चलबिचल... ही कोणती शक्ति आहे ते त्या गणरायलाच ठाऊक...

पण कधी कधी मनात एक विचार येऊन जातो खरच हे काय आहे तरी काय... माणूस खरचं देवाला भेटायला आतुर असतो की आपले मागणे मागण्यासाठी आसुसलेला असतो... कोणाच्या मनात काय चालेल हे मला तरी इकडे बसून समजणार नाही... असे मानून ते पण मी गणरायावरच सोडतो... माणूस पण कसा असतो ना जिकडे त्याला मर्यादा येतात तिकडे तो सर्व देवावर सोडतो... आणि जे त्याला जमते ते केल्यावर मी ते केले हे मिरवत फिरतो...

सकाळी टिव्ही वर सिद्धीविनायकचे दर्शन झाले... त्याला पाहण्यासाठी जमलेली लोकांची गर्दी पाहून आनंद होतो पण काही विचार मनात डोकावीतात आणि मन कासावीस होते... की आज भारतात लोक इतके शिकून सुद्धा अशिक्षित तर नाही ना राहीले???... हा प्रश्न पडण्याचे एक आणि एकच कारण आहे ते म्हणजे घरातली गणरायची मूर्ती असो किंवा सिद्धीविनायकाची शेवटी देव तर एकच आहे ना... मग हा साधा विचार माणूस का करत नाही???... की त्याला करायचाच नाही... जर भक्ति खरी असेल तर देव नक्कीच भेटतो मग तो कसाही भेटेल त्यासाठी सिद्धीविनायकचे दर्शन झाले पाहिजे असा अट्टहास का???

मला माहीत आहे की मी असे लिहिण्याइतका मोठा नक्कीच नाही झालो पण जे दिसते मनात जे काही कुजबुजते आहे ते मांडण्यासाठी काय हरकत आहे... आजच्या धावत्या जगात आपण असा विचार करायला लागलो तर खरच येणार्‍या पिढीला आपण काय शिकवणार??..

आपण देवाला माणसात पाहायला शिकलो तर????......देव सर्व पाहतोच आहे आणि त्यालाच ठरवू देत काय बरोबर आणि काय चुकीचे... मला जे काही वाटते ते त्यालाच अर्पण करायचे हे काम मी करतोय एकदम प्रामाणिकपणे.... आणि या पुढे मी काय करायचे ते ठरवण्यासाठी देव समर्थ आहेच... आता त्याला पण थोडा वेळ देतो नाहीतर देव बोलले सर्व तूच बोलतोयस अरे मला पण थोडा वेळ दे ना...:)... तर आता इकडेच थांबतो...

'राहुल गांधी' उवाच

'२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे' इति 'राहुल गांधी' उवाच....

अरे राजा पण त्यात मारले गेले त्यात जास्त संख्या कुणाची होती????.... कॉंग्रेस मध्ये एकच चांगला माणूस आहे असे वाटत असताना त्याने पण असे बोलावे???....आता तरुण सुद्धा मतदान करताना १०० वेळा विचार करतील... 'मुंबई सगळ्यांची आहे' मान्य आहे रे सोन्या...... पण म्हणून त्या बिचार्‍या मुंबई वरच राजकारण का??... त्यापेक्षा बाकीचे प्रदेश विकसित करण्याकडे लक्ष का देत नाहीस???... बिहार चा विकास करण्यावर जोर दे ना... आपण तिकडे का जात नाही.. असा बिहार बनवून दाखव की मुंबई सोडून सर्व तिकडे गेले पाहिजे... तर तुला मानतो... इतके सारे बोलण्यापेक्षा आपण सारे मिळून एक चांगला भारत बनवू इतके बोलला असता तर तुझ्याबदलचे माझे मत तरी चांगलेच राहीले असते... असो इति 'निलेश कुंजीर' उवाच... :)