Tuesday, May 11, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-३

लालसर मातीचा गंध मनात दरवळतो... पायवाटेला खेटून उभी असलेली झाडी आणि हवेतला गारवा सार सार हवहवसं वाटणार.... ....आंब्याच्या झाडावरून कोकिळेचे मधुर स्वर.....चिंचेची उंच उंच झाडे एकापाठोपाठ एक दिसू लागतात....
बाजूलाच दूरवर पसरलेल्या शेताकडे नजर जाते आणि सोनेरी पिवळी कणसे आपल्या येण्याने आनंदित होऊन डोलतात की काय असा भास होतो.... आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैर्‍या पाहून तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही....
त्या तोडण्याचा मोह ' आपण नंतर येऊन तोडूया ' असा विचार करून त्या क्षणी का होईना आवरतो...

गावाच्या जवळच असणारी विहीर आता दिसू लागते... तिकडे पाणी भरणारे गावकरी आपल्याकडे पाहत असतात... त्यांच्याकडून आईवडिलांची विचारपूस सुरू होते... आई वडील त्यांच्याबरोबर बोलताना आपण लगबगीने विहिरीत डोकवतो.... हिरव्या पाण्यात आपलेच प्रतिबिंब न्याहाळताना हरवून जातो....विहिरित डोकावताना ' ओओओ ' असा जोरजोरात आवाज करतो...तेव्हा काही सेकंदाताच आपलाच आवाज पुन्हा आपल्याला येतो... काहीतरी जादुच होते आहे की काय?..असे मनात येते.... एकदाच ओरडलो तरी आवाज ३ वेळा कसा येतो हे जाणण्यासाठी पुन्हा आवाज करतो.... कान विहिरिला लावून पुन्हा पुन्हा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.... आईचे बोलून झाले की तिचा हात धरून पुढे निघतो....

गावातील ओळखीचे चेहेरे आता दिसू लागतात...गावात येताच समोरच मंदिर दिसते.. मंदिरासमोर मोठे वडाचे झाड ... त्याच्या पारंब्याना बिलगुन खेळणारे चिमूरडी मुले आणि सावलीत कट्यावर वृतपत्र वाचत बसलेली आजोबांच्या वयाची मंडळी...' राम राम पाव्हनं..कसं काय चाललाय??...' आई बाबांना पाहून प्रत्येकजन आमची खुशालि जाणून घेतो.... त्यातलेच कोणी आजोबा मग आपले गालगुच्चे घेतात आपण पण ओळख असल्यासारखे आईच्या पदरामागे लपून लाजत लाजत त्याना स्मित हास्य देतो... पण पुढे गेल्यावर ते कोण होते??? मी त्यांचा कोण लागतो??? ते कुठे राहतात?? असा प्रश्नांचा वर्षाव आपण बाबावर करतो .... बाबा आपल्याला ते कोण आहे हे फोडणी करून समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सार काही समजल्यासारखे मान डूलवतो... पण आपल्याला काहीच समजले नाही हे आपल्याला आणि बहुदा बाबांनासुद्धा माहीत असते...

क्रमश:

No comments:

Post a Comment