Friday, May 7, 2010

चला चला गावाकडे पळा... भाग-२

सकाळी थंड वार्‍याची झुळुक अंगावर शहारा आणते... गाढ झोपेत असलेलो आपण स्वतः जागे होऊन खिडकीतून बाहेर डोकवू लागतो. आजूबाजूला पडलेले धुके आणि त्यातून पूसटशी दिसणारी हिरवीगार झाडी असा नयनरम्य परिसर पाहून डोळे दिपून जातात.

गाडी स्थानकावर येऊन थांबते... बाबा आवाज देतात बेटा चला उतरायचे आहे... पुन्हा खेळण्यांची बॅग हातात घेऊन आपण खाली उतरतो... बस स्थानकावरच्या हॉटेल मध्ये बाबा घेऊन जातात... कोण कोण काय काय खाणार??? असे विचारताच एक एकाची फर्माईश सुरू होते.... कोणाला गरमागरम भजी हवी असते...कोणाला बटाटा वडे, समोसे...तर कोणी मिसळ वर ताव मारतो...सर्व खाऊन झाल्यावर गरमागरम कटिंग चहा पिऊन सारे तृप्त होतात...

त्यापुढचा प्रवास जीपने होणार असतो... जवळजवळ १२/१३ माणसे असूनसुद्धा त्याचा ड्राइवर जायला तयार नसतो.... साहेब अजुन ४ सीट होऊदेत मग हलवतो गाडी... गाडी म्हणजे जणू कोंबड्यांचा खुराडा होऊन जातो... अजुन ४ सीट बोलून ६ जण गाडीवर स्वार होतात... ड्राइवर गाडीच्या अर्धा बाहेर जाउन गाडी कसा चालवतो हे त्याचे त्यालाच माहीत... कच्या रस्त्यावरून जाताना गाडीपेक्षा माणसाचेच पार्ट जास्त हलतात....या सार्‍या गर्दीमध्ये आपले लक्ष मात्र बाहेरच असते... गावाकडची वाट आपल्याला साद घालत असते.... आंब्याची, चिंचाची झाडे दिसायला हळूहळू सुरूवात झालेली असते... या पुढच्या २० मिनिटांच्या प्रवासात आपण विचारण्याच्या आतच आई आपल्याला 'आता आलेच हा आपले गाव' असे कमीत कमी १०/२० वेळा बोलून मोकळी होते...

गाडी गावच्या फाटकापाशी येऊन थांबते... बाहेर येताच आपण २ मिनिटांच्या अंतरावर वसलेल्या आपल्या छोट्याश्या गावाकडे हसरी नजर फिरवतो.... गावातले मंदिर आणि त्यावर फडकणारा भगवा झेंडा, जुनी कौलारु घरे, आणि लालसर मातीत न्हाहून निघालेली पायवाट, हिरवी पिवळी झाडे....सारे सारे आपल्या स्वागतासाठी सजले आहेत की काय असा भास होतो...

क्रमश:

No comments:

Post a Comment