Wednesday, March 25, 2020

परीक्षित

दादर ट्रेनच्या गर्दीतून धक्काबुक्की करत करत अनिकेत फाइनली सेकण्ड क्लासच्या डब्यात शिरला. ट्रेनच्या दरवाज्यालगत थोडी का होईना हवा लागावी म्हणून तिथे त्याने थोडीशी जागा पटकावली. ट्रेनचा भोंगा जोरात वाजला ट्रेनने दादर स्टेशन सोडले. तितक्यातच घामाच्या धारेत न्हाउन निघालेला एक भैया धावत धावत डब्यात घुसला आणि अनिकेतला खेटून उभा राहिला. आधीच अंगाची लाही लाही होत असताना हा भैया अंगाला चिकटतोच कसा यावरून त्याने भैयावर खेकसायला सुरूवात केली 'अबे साले समझता नाही क्या? फर्स्ट टाईम ट्रेन मे चढा है क्या? तू एक काम कर मेरी गोदी मैं बैठ' भैया सर्व शांतातेने ऐकतोय हे पाहून त्याचा पारा आणखी चढला. शेवटी भैयाला दोन-तीन शिव्या देऊन त्याला हायसे वाटले. बिचारा भैया एक फूट लांब जाऊन उभा राहिला. तरीही अनिकेत तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपूटत होता.

दादर ते अंबरनाथ असा रोजचा प्रवास आणि त्यात अशी चित्रविचित्र माणसे जीणे नकोस वाटत कधी कधी. हे आणि असे अनेक विचार त्याच डोक पोखरत होते. खर सांगायच तर जॉबमध्ये अनिकेतला रस नव्हताच त्याचा कल बिजनेसकडे होता पण इतका पैसा येणार कुठून? आणि कसा?? शेवटी उत्तर न सापडल्याने त्याने जॉब करण्याचा निर्णय मनाच्या विरोधात जाऊन घेतला होता. 

तस पाहायला तर घरात सर्व छान चालू होत. वडील बीएमसी मध्ये, लहान अन मोठा भाऊ दोघे कामावर आणी राहायला अंबरनाथ मध्ये बंगला तरीही मनाच समाधान महत्वाच अस मानणारा अनिकेत.

पाच मिनिटे झाली तरी गाडी जागची हलत नव्हती गर्दीतून आत जावे, असा विचार करून सुद्धा फायदा नव्हता कारण गर्दी इतकी होती की लोक एकमेकांना मिठी मारुन उभे असल्याचा भास होत होता.

ट्रेन सुरू होतच अनिकेतला हायसे वाटले जवळजवळ सहा फूट उंची, मजबूत बांधा, थोडा राग आला तरी लालबुंद होईल असा गोरा वर्ण, अंगावर नेहेमी कडक ईस्त्री असलेले कपडे आणि जेवणाचा डबा मावेल इतक्या आकाराची बॅग, अशा गर्दीत त्याच्या दोन मोठ्या बॅगांची दुर्दशा झाली होती तेव्हापासून त्याने पुन्हा कधी मोठी बॅग घेतलीच नाही; बाकी सर्व सामान तो ऑफीसच्या लॉकर मध्येच ठेवायचा.

ट्रेनचा स्पीड वाढत होता तसतसा दमट वारा अनिकेतला दिलासा देत होता तरीसुद्धा कोणाचा थोडासा धक्का लागणेही त्याला सहन होत नव्हतं.

अनिकेतचा स्वभाव आधी इतका तापट नव्हताच, समोरच्यावर चिडताना तो दहा वेळा विचार करायचा आणि कधी रागच्या भरात कोणालाही काही बोलला तरी त्याला नंतर पश्याताप व्हायचा. माफी मागायला आणि माफ करायला नेहेमी पुढे असायचा. मित्र आणि नाती यापुढे त्याला सर्व फिक वाटायचे. त्याचे बाबा त्याला नेहेमी सांगायचे "अरे असा नको राहूस रे, व्यवहार समजले पाहिजेत आता तू मोठा झाला आहेस", पण अनिकेत! तो मात्र एकदम कूल.

पण काही अनुभव इतके वाईट असतात; की त्यामुळे दुसर्‍याबदद्ल चांगले मनात असतनासुद्धा माणूस तसा वागत नाही. अनिकेतचे नातेवाईक, जे त्याला एकदम जवळचे होते; तेच नकळत त्याच्यापासून दुरवले होते. तो ज्या जवळच्या लोकांवर जीव ओवाळून टाकत होता तीच त्याची जवळची माणसे त्याच्यापासून दूर जायची हा त्याचा नेहेमीचा अनुभव आणि याची सल काही केल्या त्याच्या मनातून जात नव्हती. त्याचे मित्र, त्याचे नातेवाईक एवढेच नाही तर त्याच्या घरातल्यांकडून सुद्धा त्याला हाच अनुभव आला होता.

त्याच्या अशा स्वभावासाठी कारणीभूत असलेली अशीच एक कॉलेज च्या दिवसाची गोष्ट.

११वि साठी अनिकेतचे अड्मिशन रुईया कॉलेज मध्ये झाले. तसे त्याला कॉलेज करायचे नव्हते त्याचा इण्टरेस्ट पेंटिंग मध्ये होता पण जे जे ला जायचे असेल तर १२वी करणे गरजेचे होते. म्हणून त्याने आर्ट साइट घेऊन बारावी करण्याचा विचार केलेला. कधी नाही ते त्याला दहावी ला चांगले टक्के मिळाल्याने त्याचे अड्मिशन पटकन झाले.

कॉलेजचा पहिला दिवस. कॉलेज म्हणजे काय हे टीव्ही आणि फिल्म मध्ये पाहिलेले, त्यामुळे मनामध्ये थोडीशी भीती आणि एक्साईटमेंट. शाळेमध्ये रोजचा यूनिफॉर्म पण आता रोज रंगीबेरंगी कपडे घालता येणार त्यामुळे त्याचा चेहेरा चांगलाच फुलला होता.

वर्गासमोर येताच त्याच्या हृदयाचे ठोके वाढायला लागले. इकडे तिकडे न बघता अनिकेत वर्गात शिरला. मुद्दाम काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी त्याने बॅगेतून वही बाहेर काढली आणि हळूच तिरक्या नजरेने इकडे तिकडे पाहु लागला. नवनवीन चेहेरे स्टाइल मारणारी मुले चेहेर्‍याची रंगरंगोटी केलेल्या मुली आणि यांच्यामध्ये अनिकेत सारखी दबकून खाली मान घालून बसलेली काही मुले.

वर्ग जवळजवळ पूर्ण भरला होता. तितक्यात दोन-तीन मुलांनी एकत्र आवाज केला 'वॉव, क्या आयटम है'.' अनिकेत ने त्यांच्याकडे पाहून ते कुठे पाहून बोलत आहेत याचा त्याने अंदाज घेतला आणि त्या दिशेने आपली नजर फिरवली. एक सुंदर मुलगी वर्गात पहिल्या रांगेत येऊन बसली आणि बाजूला तिच्या ओळखीच्या मुलीशी बोलू लागली. गोरा वर्ण, काळेभोर लांब केस, पाणीदार डोळे, गालावर खळी, ओठांना हलकीशी लिपस्टिक, आणि लक्ष वेधून घेईल असा गुलाबी रंगाचा लांब कुर्ता. फिल्म मधली हीरोइन किंवा स्वप्नपरी भासणारी ती मुलगी अनिकेत ला सुद्धा आवडली पण तरी त्याने हि बड्या घरची दिसतेय आपल्याला नाही परवडणार असे मनाला समजावून दुर्लक्ष केले. 

शाळेत असताना असे बरेच वाटायचे कि मुलींशी बोलावे, टिपिकल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे हातात हात घालून चालावे पण निळी हाफ चड्डी आणि सफेद शर्ट वर हातात हात घालून फिरणे तर दूरच मुलींशी बोलायला पण लाज वाटायची. त्यातही अनिकेत ला एखादी मुलगी आवडली कि त्या आधीच त्या ऑलरेडी एन्गेज आहे हे त्याला कळायचं. 

क्लासटीचर काही वेळाने वर्गात आले आणि त्यांनी प्रत्येकाची ओळख उभं काहून करून द्यायला सांगितली
ती उभी राहिली आणि अनिकेत च डोळे वटारून कान टवकारून तिच्याकडे पाहू लागला. तिने नाव घेतले
‘अनुपमा राणे’.

वाह! अनिकेत ने मनातच म्हटले. नाव एकदम बरोबरच होते अनुपमा- जिला उपमा देता येत नाही, अद्वितीय अशी.

अनिकेत चा पहिला दिवस थोडा टेन्शन मध्येच गेला कॉलेज हा प्रकार फक्त चित्रपटात पहिला होता जो आता तो समोर अनुभवत होता. त्याच्या बाजूला बसलेल्या दोन टपोरी मुलांशी त्याची ओळख झाली. दिनेश आणि राहुल अशी त्यांची नावे.

दिनेश दिसायला तसा छ्परीच होता. वेणी बांधता येईल इतके लांब केस, कॉलर वर केलेली, रंगीबेरंगी फुलांचा शर्ट, आणि नवी कोरी पण विविध रंगाचे ठिगळं असलेली स्टायलीस्ट जीन्स, दणकट शरीर असलेला दिनेश आठवड्यातले ४ दिवस तरी नक्कीच नॉनव्हेज वर ताव मारत असणार हे त्याला पाहून लगेच जाणवेल.
राहुल मात्र सडपातळ, उंच आणि शांत होता. चेहेर्‍यावरून आणि पेहेरावावरून साधा वाटत असला तरी त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी असायची जर त्याला सांगितले कि ‘ मी शिव्या देणे सोडतो असे वाक्य बोल’ तर त्यातही त्याने २/४ शिव्या नक्कीच दिल्या असत्या. एकंदर स्वभावाने ते त्याला चांगले वाटल्याने त्यांच्याशी मैत्री करणे त्याला वावगे वाटले नाही. पण त्यांच्या अनुपमा बद्दल च्या कॉमेंट्स त्याला अजिबात आवडत नव्हत्या.

कॉलेज सुटल्यानंतर अनिकेत बाहेर आला त्याला अनुपमा दिसली त्याला दिसलं कि कोणीतरी मुलगा तिला घ्यायला आला होता ती मैत्रिणीला बाय बोलून त्याच्या बाईक वर बसली अनिकेतचं पुन्हा एकदा त्याला आवडलेल्या व्यक्तीचा बॉयफ्रेंड असतोच ह्यावर शिक्कामोर्तब झालं. अनिकेत घरी जाण्यासाठी निघाला तितक्यात दिनेश ने त्याला हात खेचून मागे घेतले आणि त्याला बोलला ‘ काय रे कुठे निघालास?... तितक्यात राहुल सुरु झाला ‘ असे कुत्र्याला हड्डी दिसली कि तो जाणारच ना त्यामागे’ अनिकेत त्याच्याकडे रागाने पाहू लागला. दिनेश हसून बोलला 'रागावू नकोस रे चल आमच्याबरोबर फिल्म पाहायला जावू'. माझ्याकडे पैसे नाहीत रे तुम्हीच जा असे बोलून अनिकेत त्यांना टाळू लागला.
‘अरे पैसे खूप आहेत माझ्या बापाकडे. तू काळजी करू नकोस फक्त चल’ दोघे त्याला ओढत घेऊन गेले.

तिघे चित्रपट गृहात शिरले... दो प्यार करने वाले जंगल में खो गये हे जंगल चित्रपटातलं गाणं ऐकताना अनिकेत सुद्धा त्या प्रेमाच्या जंगलात हरवून गेला. पूर्ण चित्रपटात तो स्वतःला समोर पाहत होता...  क्रमश: