Tuesday, May 18, 2010

अपेक्षांचे ओझे

"सर्वच क्षेत्रांत स्पर्धा असल्याने मुलांवर ताण येतो. अशा वेळी मुलांशी मैत्री करा; त्यांना समजून घ्या. त्यांच्या अडचणी जाणून घ्या. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणू नका,' अशी कळकळीची विनंती आत्महत्या केलेल्या मुलांच्या पालकांनी समाजाला केली आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय नाही. आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी आपणही समाजाचे; आई-वडिलांचे काही देणे लागतो, याचे भान ठेवा, असे मनःपूर्वक आवाहन त्यांनी केले आहे -
वृत्तपत्र - ई-सकाळ

पालक आणि मुले यांच्यातली दरी आणखी खोल खोल होत चालली आहे का??.. असा प्रश्न निर्माण करणारा हा लेख....

एखादे अपत्य जन्माला आले की त्याबरोबर अजून एका गोष्टीचा जन्म होतो आणि तो म्हणजे ' अपेक्षा ' या लहान वाटणार्‍या शब्दाचा...
लहान असताना मुलाच्या तोंडी पहिला शब्द असतो तो 'अ'.. पण मुलाने 'अ'पेक्षा जास्त बोलावे साठी प्रयत्न सुरू होतात... मग त्याला काका, मामा, दादा, मावशी असे शब्द बोलायला शिकवले जाते... आणि ते तो बोलू लागला की अजून बरेच शब्द (जे त्याला त्या वयात शक्य होऊ शकत नाही ते सुद्धा) त्याला शिकवण्याचा अट्टहास केला जातो....मूल जसजसे मोठे होत जाते तसेच अपेक्षेचे शेपूट वाढत वाढत जाते...
आपला मुलगा आपल्या शब्दाबाहेर नाही हे दाखवण्यासाठी नकळत आपण त्याच्यावर मोठे ओझे टाकून मोकळे होतो (मी नकळत असे म्हटले आहे) काही मुलांनी जरी हे कर्तव्य म्हणून स्वीकारले असले तरी तुरुंगवास भोगत असल्याचा भास बाकीच्या असंख्य मुलांना होत असतो...

मान्य आहे की जन्मदात्यांचा अधिकार मुलांवर त्यांच्यापेक्षा अधिक असतो आणि हे आजची तरुण पिढी जाणून आहे आणि तरीसुद्धा त्यांच्यावर निर्बंध लादण्याची गरज आहे का???.... हा प्रश्न पालकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे.

बर्‍याचवेळा नातेवाईकांकडून 'तुमच्या आईवडिलांनी स्वतंत्रपणे किती कष्ट करून हे सार तुमच्यासाठी उभे केले आहे' हे विधान सारखे सारखे ऐकवले जाते पण समजा तेच स्वातंत्र्य मुलाला एकदा दिले तर???
जेव्हा जेव्हा मुले चुकतात तेव्हा त्याची जाणीव त्यांना करून देणे ह्यात काहीच वावगं नाही पण त्यांच्या प्रयत्नांना खतपाणी घालण्याचे काम मोठ्यांनीच केले पाहिजे आणि त्याचा फायदा पालक आणि मूल या दोघांना होऊ शकतो...

सध्यातरी माझ्या मते मुंबईमध्ये ७० ते ७५ टक्के आईवडिलांच्या काही अपेक्षा तंतोतंत जुळत असतील
त्यातली एक म्हणजे आपली मुले इतरांपेक्षा ग्रेट असावीत...
आणि दुसरी म्हणजे आपण विवाहासाठी ठरवलेले स्थळ हेच त्यांच्यासाठी योग्य आहे आणि तोच त्यांनी मानावा...

पहिली अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वच मुले प्रयत्न करतात कारण तिकडे प्रश्न असतो तो फक्त मेंदूला चालना देण्याचा (आणि कधीकधी स्वार्थीपणाचाही)
पण दुसरी अपेक्षा पूर्ण करताना कोणी क्लिन बोल्ड होतो तर कोणी रन आऊट कारण इकडे ना मेंदू चालतो ना शहाणपणा.. असतो तो फक्त आणि फक्त वेडेपणा... यावेळी शरीराला, मेंदूला आणि बहुदा आत्म्याला सुद्धा मनानेच काबीज केलेले असते आणि या वेडेपणामध्येच आपण कबुलीजबाब आईवडिलांना देतो...त्यांच्यासाठी मात्र तो अपेक्षभंगाचा झटकाच असतो...
त्यांना तो सहन होत नाही मग लगेचच मुलांना न विचारता बाकीची जुळवाजुळव सुरू होते.. मुलांच्या विरोधात जाऊन त्यांची मते न जाणता लग्न ठरवले जाते... यावेळी मुलाच्या मनात काय चालले आहे... त्याचा होकार नकार याला काहीच महत्व दिले जात नाही..अशावेळी मुलांसाठी हा अपेक्षभंगाचा झटका असु शकत नाही का??
आपल्या मुलाने/ मुलीने पाहिलेले स्थळ सारा विचार करून पाहिले असेल असे मोठ्यांना अजिबात वाटत नाही का??.. की त्यांना असे वाटूनच घ्यायचे नाही?

मुलांवर विश्वास टाकून जर त्यांची मने जिंकता आली तर त्यांच्या मनातला मोठ्यांविषयी असणारा आदर अजून खूप पटीने वाढेल यात तीळमात्र शंका नाही...जनरेशन गॅप मधला फरक जाणून घेऊन एकमेकांना समजून आणि जाणून घेण्याची वृत्ती प्रत्येकाने (मोठ्यांनी आणि तरुणपिढीने सुद्धा) मनात बिंबवण्याची गरज आहे आणि ती यापुढेही राहीलच...

अपेक्षाभंग, आत्महत्या, भांडणतंटा, घटस्फोट, मानसिक त्रास, दु:ख, क्लेश या आणि अशा गोष्टींचे ओझे कमी करायचे असेल तर एक आणि एकाच उपाय आहे तो म्हणजे समोर असणार्‍या व्यक्तीच्या डोक्यावरचे 'अपेक्षांचे ओझे' रिक्त करणे...

No comments:

Post a Comment