Thursday, February 2, 2012

लहानपण देगा देवा


जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण 


वाह तुकारामांच्या या ओळी खरंच खूप काही सांगून जातात... आयुष्य जगताना लहान होऊन जगलो तर खूप काही शिकू शकतो... 'लहान होऊन मोठेपणा मिळवणे' याहून वेगळे नाही...


आजच्या धावपळीच्या जीवनात नक्की काय कमवायचे हे जर माहित असेल तर चेहेरा कायम टवटवीत, हसरा आणि निरागस अगदी लहान असताना होतो तसा राहू शकतो... 


बालपणात आपण समोरचा व्यक्ती काय करतोय हे पाहून त्याचे शब्द ऐकून तसा वागण्याचा प्रयत्न करतो मग ते चुकीचे आहे कि बरोबर हे आपल्याला त्या वयात समजत नाही... पण आपण जसजसे वयाने मोठे होतो तेव्हा चूक काय किंवा बरोबर काय याची जाणीव होऊ लागते... तरीही समोरची व्यक्ती चांगली किंवा वाईट छाप आपल्यावर सोडून जात असतेच... 
आणि हीच शिकण्याची प्रक्रिया शेवटच्या क्षणापर्यंत जपता आली पाहिजे... 


लहान राहूनच शिकले तर त्याचा परिणाम जास्त आणि योग्य दिसतो कारण तुकारामांच्या वरच्या ओवीनुसार जेव्हा आपण एखादे कार्य करताना मोठेपणा मिरवायला जातो तेव्हा त्याचंबरोबर 'अहंकार, अति आत्मविश्वास' घातक ठरतो. ते कार्य आपल्या मनासारखे न झाल्याचा त्याचा त्रास आपल्यालाच होतो... आणि मग मनावरचा ताबा सुटून चीडचीड तणाव वाढत जातो..आपल्याला सर्व येते हे मनात आले कि आपली प्रगती खुंटते...


आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा पूर्ण अभंग ...


लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।। 
- संत तुकाराम