Thursday, March 31, 2011

'प्रेमभंग' - संभाषण

प्रेम हा विषय सर्वांसाठी जवळचा आणि जुना पण त्या पेक्षाही 'प्रेमभंग' हा विषय गहिरा आणि न शोधताही जागोजागी सापडणारा.
अश्याच एक मुलाच्या भावना जपणारा त्याचा मित्र, जो त्याच प्रकरणातुन सुखरूप बाहेर पडला आहे त्या दोघांचे संभाषण कसे असू शकते हे जाणण्याचा हा एक प्रयत्न;

मित्र १ - हेलो कसा आहेस रे?

मित्र २ - मी मस्त. तू कसा आहेस?

मित्र १ - अरे मी पण ठीक आहे. कालच तुझ्या कविता वाचल्या. छान आहेत. कसे जमते हे तुला?

मित्र २ - (हसतो) सुचेल तसे लिहायचे...मग जमते आपोआप.

मित्र १ - मी देखील खुप प्रयत्न केला रे पण नाही जमत तुझ्यासारख लिहायला :( ... खरच रे मस्त लिहितोस...मला एक सांगशील का?

मित्र २ - विचार ना.

मित्र १ - आनंदात रहायला काही कारण लागत का रे मित्रा?

मित्र २ - नाही रे...आनंदात रहाण्यासाठी तसे काहीच कारण लागत नाही.. आणि जरी असले तरी माझ्या दृष्टीने एक गुपित आहे आनंदाचे ते म्हणजे 'समाधान'. आयुष्यात काही मिळो वा न मिळो त्यातून समाधान मिळाले की आनंद आपोआपच गवसेल.

मित्र १ - हो रे तू बोलतोस ते खरे आहे पण... पण कधी कधी एकदम तुटून जातो मी नाही राहता येत आनंदात...

मित्र २ - तेव्हा स्वत:ला कशात तरी गुंतवून घ्यायचे... जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करायचा

मित्र १ - हो रे मी तेच करतो पण राहून राहून तेच सगळे नको असलेले विचार डोक्यात येतात आणि सगळे एकदम गुंतागुंतीचे होते, मन नाही लागत कुठेही, सुचत नाही काहीही, कोठे आहोत काय करतो काही समजतच नाही.

मित्र २ - हम्म प्रेम? की प्रेम भंग काय आहे?

मित्र १ - तुला कसे कळले ?

मित्र २ - (हसतो) प्रत्येकाची लाइफ सारखीच असते रे थोड्या फार फरकाने...

मित्र १ - सारखे सारखे ते डोक्यात थैमान घालते आहे रे.

मित्र २ - मग डोक्यात आले की ते का येते? आणि ते येऊन माझे आयुष्य चांगले होणार आहे का.. की त्यामुळे मी भरकटत जातोय हा विचार करायचा...

मित्र १ - हो खरय, मी अजुन तरी भरकटलो नाहीये, पण खरच सांगतो आपण ज्याला मनापासून सर्व काही देतो तोच आपला विश्वासघात करतो असे का होते रे?

मित्र २ - असे वाटून नको घेऊस मित्रा...प्रेम हे निस्वार्थी हवे... त्यात समर्पण असावे... समोरची व्यक्ति तुझ्याबरोबर आनंदित नसेल तर असे प्रेम मिळवून तू तरी आनंदी राहशील का? ती व्यक्ती जिकडे खुश आहे तिकडे राहुदे त्या व्यक्तीला... तू फक्त देवाकडे त्याचा आनंद मागत राहा अखंड, कारण तुझे प्रेम खरे आहे तर तू त्या व्यक्तीसाठी फक्त प्रार्थना आणि चांगले तेच मागू शकतोस देवाकडे. त्या व्यक्तीचा आनंद हा तुझा आनंदचा स्त्रोत असेल.

मित्र १ - होय मलाही असेच वाटते... तीलाहि मी हेच संगितल की तुला जे प्रिय आहे तिकडेच तू राहा... पण माझी अशी अवस्था आहे "माणूस धड उडत पण नाही आणि धड पडत पण नाही". मी दिलेल काही मागत नाही आहे किंवा त्याचा मोबदला पण मागत नाही आहे पण खर काय ते सांगून, तीने तू माझ्या आयुष्यातून निघून जा हे सांगितले पाहिजे ना मित्रा? मन शांत ठेवण्यासाठी तर मी देवाचा आधार पण घेतला आहे.

मित्र २ - अरे हे असे काही जीवनात घडले की आपण स्ट्रॉंग होतो... आणि ती आपण आपली कमजोरी न समजता स्ट्रॉंग पॉइण्ट समजायचा... हरण्यात सुद्धा एक वेगळीच मजा आहे ...

मित्र १ - ह...पण रोज आपण विचार करायचा की आता फ़ोन येईल आता ती मला येऊन भेटेल, पण हे काय ही तर दुसऱ्याबरोबर गेली सुद्धा आपण परत हताश होऊन आपल काय चुकल हा विचार करत कुडत बसायच,,,,, आणि संध्याकाळी परत ती फ़ोन करते "कसा आहेस तू ? काय करतोय? जेवलास की नाही...मला आज तुझी खुप आठवण येत होती रे" काय बोलायच ह्याच्या पुढे.

मित्र २ - हे कधी घडले ?

मित्र १ - तुला सर्व सांगतो. गेली ४ वर्ष आम्ही एकत्र आहोत. पण या १४ फेब्रुवारी ला भयानक प्रकर घडला

मित्र २ - काय घडले??

मित्र १ - मला भेटायचे कबूल केले होते तिने पण फ़ोन करून ती बोलली की मी नाही भेटणार. मी विचारल सुद्धा का ते पण बोलली की मी घरी जाते आहे कॉलेज वरून बर नाही वाटत. मी बोललो ठीक आहे काळजी घे. तिला घरी पोहोचायला ३० मिनिटे लागतात पण ५.३० ला निघून ती ९.३० ला घरी गेली

मित्र २ - हे तुला कसे समजले

मित्र १ - माझ नशीब ख़राब. कारण त्याच वेळी मीसुद्धा स्टेशन वरून घरी निघालेलो. अचानक दोघे समोर... विचार कर काय अवस्था झाली असेल माझी? ती खर बोलून गेली असती तर समजुन पण घेतले असते रे पण खोट बोलली याचे खुप वाईट वाटते आहे.

मित्र २ - या जगात जर प्रत्येकाला हवे तसे मिळत गेले तर जगात दुःख राहणारच नाही रे आणि दुःख नसेल तर सुखाचे महत्त्व कसे समजेल?
एक सांगू समोरचा कितीहि वाईट वागू दे आपण चांगलेच वागायचे... समोरच्याला त्याची चुक आपणहून कळते... आणि नाही कळली तरी कोई बात नहीं...कारण आख्ख आयुष्य आहे रे मित्रा...एकच गोष्ट नाही लाइफ मध्ये... मित्रा ठेच लागुन पडलास तर काय चालणे सोडून देणार का ?
तिला असे काही करून दाखव की तिला समजले पाहिजे की तिने काय गमावले आहे...तू गमावले असे चुकुनही समजू नकोस... काय कमावले आणि काय गमावले याहीपेक्षा यातून काय शिकलो ते जाणून घेणे जास्त गरजेचे नाही का?

मित्र १ - खरच एकदम मनातल बोललास, तू पण माझ्यासारखा मनकवडा आहेस का रे? कारण तू बोलतोय ना ते करतोय मी...

मित्र २ - आयुष्य सार काही शिकवत बघ... पाण्यात पडलो की पाय मारायला आपसुकच येते ना? झाले ते विसरून फ़क्त पुढे चालत रहायचे... आता या साऱ्या पसाऱ्यातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न कर...

मित्र १ - नक्की मित्रा मी ह्यातून बाहेर पडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन. आणि नाव कमविन... खुप खुप मोठा होईल... थैंक्स मित्रा आज खुप हलके वाटते आहे

मित्र २ - नक्की होशील मला विश्वास आहे... इतका मोठा हो की प्रत्येकाने तुझ्यावर प्रेम केले पाहिजे तुझा आदर केला पाहिजे... फ़क्त जगण्याचा एक मंत्र लक्षात ठेव... पाय नेहेमी जमिनीवर ठेव तरच दुनिया तुझ्या पायाजवळ असेल... ऑल द बेस्ट फॉर लाइफ... आता ठेवतो फ़ोन काळजी घे बाय

मित्र १ - तू सुद्धा मित्रा बाय

Saturday, March 5, 2011

'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'

आज सहज दादर ला स्पेक्ट्रा मध्ये गेलो होतो समोरच एक लक्ष वेधून घेणारे सीडी कव्हर नजरेसमोर आले.

'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलंसं गाव'
गायक संगीतकार मिलिंद इंगळे आणि कवी ज्ञानेश वाकुडकर यांचा एक आगळवेगळा प्रयोग...

प्रेयसिच सौंदर्य वर्णन करणार २१ अंतर्‍याच एक सलग गाणं
बापरे!!! वाचूनच टेन्शन आले आधीच आजकालची ५ मिनिटांची गाणी सुद्धा नकोशी वाटतात तिकडे ३६ मिनिटाचे सलग गाणे??

पहिले तर मिलिंद इंगळे यांना सलाम केलाच पाहिजे कारण अशी जोखीम उचलनं खरच... हॅंड्ज़ ऑफ टू मिलिंद सर...

सीडी कव्हरच्या आतील मजकूर पण खूप काही सांगून गेला... मिलिंद इंगळे, ज्ञानेश वाकुडकर आणि प्रायोजक सागर शिरोळे याची नेमकी पण सुंदर अशी प्रस्तावना.... आणि १ ते २१ अंतरे अनुक्रमणिके सहित...

या प्रवासात प्रत्येकाने केलेल्या कामाची पावती त्यांच्या फोटोसहित न विसरता दिली गेली आहे हे विशेष... एकूणच सर्व छान जुळून आले आहे हे समजून आले होतेच...

उत्कंठा वाढत चाललेली म्हणून वेळ वाया न घालवता सीडी ऐकण्यासाठी लॅपटॉप चालू केला.

एका प्रेयसिच इतक छान सौंदर्य वर्णन इतक्या सोप्या शब्दात आणि तेही थोडक्यात नव्हे तर शंभर पानात... भन्नाट!

मिलिंद इंगळे यांचा गुंग करणारा आवाज... धुंद करणारे मधुर संगीत त्याहीपेक्षा प्रत्येक प्रियकराला प्रेयसीची आठवन करून देणारे आपलेसे वाटणारे निरागस शब्द...

प्रेयसी आणि प्रियकर यांनी एकदा तरी ऐकावे ऐकण्यापेक्षा रंगून जावे असे मला मनापासून वाटते...
गेली चार वर्ष प्रचंड मेहेनत करून मिलिंद आणि त्याच्या टीम ने उभं केलेल प्रेयसिच गाव केवळ १०० रु मध्ये उपलब्ध आहे... आपल्या प्रीयकरला आणि प्रेयसीला अजून आपलेसे करण्यासाठी याहून वेगळी भेट अजुन काय असु शकते.

सर्व काही छान झाले असले तरी एक गोष्ट मनाला सल लावते की जर असे निराळे काही येत आहे तर ते लोकांपर्यत त्याच ताकदीने का नाही पोहोचत... या गोष्टीमध्ये मराठी माणूस नेहेमीच मागे पडतोय.. मी ऑनलाइन सर्च केल्यानंतर त्याबद्दल काहीच गवसले नाही सध्याच्या धावत्या युगात मुख्यत: ऑनलाइन अश्या वेगळ्या प्रॉजेक्ट्सना पुढे आणण्याची खूप गरज आहे...

चला हे वाचून काही क्रांती घडली तर याहून आनंदाची गोष्ट काय असावी...