Friday, November 3, 2017

आरुषी

26 नोव्हेंबर 2013. तलवार कुटुंबियांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी केलेल्या कृत्याची india today मध्ये चित्रासहित पान भर आलेली, वाचलेली बातमी मला आठवते आहे...  समाज कुठे चालला आहे? आई बाबाच आपल्या मुलीला मारू शकतात? घोर कलयुग आलाय... असा विचार डोक्यात आला... त्यानंतर अनेक दिवस वाहिन्यांची ही कव्हर स्टोरी होती आणि प्रत्येकाने आपला टीआरपी वाढवला... हे हत्याकांड, ही घटना 16 मे 2008 रोजी घडली आहे हे मला आता कळलंय... काही काळाने मी सुद्धा ही घटना सामान्य माणसासारखा विसरून गेलो...

त्यानंतर 2015 ला आलेला "तलवार" हा चित्रपट मी पाहिला... आतापर्यंत मी इतके चित्रपट पाहिले असतील पण हा पहिला असा चित्रपट होता जो पाहून मी खूप अस्वस्थ झालो हे असे चित्रपट काढुच नये असं मनात आलं... पण त्यावेळी एक गोष्ट कुठेतरी मनात कोरली गेली की तलवार कुटुंब निर्दोष होतं... तो चित्रपट पाहिल्यानंतर मी गुगल ला जाऊन बरेच मुद्दे वाचले त्यात मीडिया ने या केस मध्ये किती इंटरेस्ट घेतला होता हे लगेचच लक्षात येईल. Ipl ला जितका टीआरपी नव्हता तितका तलवार यांच्या केस मुळे न्यूज चॅनेलस ला होता हे "आरुषी" पुस्तकात मांडलंय. कधीकधी  मीडिया सीबीआय च्या पुढे जाऊन आपलं शातीर डोकं लावून आपली मतं स्वतःच तयार करत होती हे मला बऱ्याचवेळा ब्रेकिंग न्यूज मध्ये जाणवत होते. 2015 वेळीच अजून एक चित्रपट आला "रहस्य" नावाचा तो सुद्धा मी पाहिला.. तलवार कुटुंबाने तो रिलीज करू नये असे वाचनात आले होते त्या चित्रपटात आईनेच मुलीची हत्या केली हे दाखवण्यात आले होते... पण रहस्य चित्रपट मला उथळ वाटला, खोटा वाटला जसं मी "आरुषी" पुस्तकात डॉ दहिया आणि सीबीआय च्या काही अधिकाऱ्यांनी (ए. जी. एल. कौल) यांनी मनाला सुचलेली, एखादी रचलेली कथा तयार केली होती अगदी तसाच...

मला आठवतंय 2015 च्या दरम्यान मी एक मित्राशी या विषयावर बोललो होतो त्यावर तो एकदम ठामपणे बोलून गेला अरे तुला माहीत आहे का त्या तलवार कुटुंबानेच हे मर्डर केले आहेत... तो इतका कॉन्फिडन्स ने बोलत होता जणू तो प्रत्यक्षदर्शी होता. मला आश्चर्यच वाटलं आणि काही क्षणासठी असेल सुद्धा असं देखील वाटलं... आपल्याला एखादी घटना 10 ठिकाणी त्याच पद्धतीने दाखवली गेली, सांगितली गेली आणि कानावर पडत राहिली तर आपण सुद्धा जास्त विचार न करता, अभ्यास न करता ती घटना अशीच असेल असा समज करून घेतो. उदाहरण द्यायचे झालं तर विद्यार्थ्याला शाळेत जे शिक्षक शिकवतात ते योग्यच असते असा प्रत्येक विद्यार्थांचा समज असतो त्यात काही चुकतं असेल तरी त्यांना उलटून प्रश्न विचारणारे विद्यार्थी बोटावर मोजता येण्यासारखेच... आणि जरी विचारलाच तर तू शिक्षक आहेस की मी? तुला जास्त कळतं का? असे सवाल येण्याची आणि मार मिळण्याची भीती वेगळीच... आपल्यापेक्षा अनुभवाने आणि वयाने जास्त असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे हा पर्याय अगदी सहजतेने आपण अंगीकारला आहे...

फिझा झा या आरुषीच्या मैत्रीनीने 12 ऑक्टोबर 2017 रोजी लिहिलेला लेख मी वाचला आता ती 21 वर्षाची झाली आहे. आरुषी खून होण्याच्या आदल्या दिवशी तिच्याकडे गेली होती. हा लेख वाचल्यावर मनात एकदम पक्क झालं की तलवार कुटुंब निर्दोष आहे तरीही फिझा ने शेवटच्या काही ओळींमध्ये लिहिलं होतं की अविरुक सेन यांचे "आरुषी" हे पुस्तक खूप महत्वाचे आहे... त्यानंतर लगेचच मी हे पुस्तक वाचायला घेतलं.. तिने लिहिलेल्या लेखाची लिंक इथे देतोय https://www.thequint.com/news/india/aarushi-was-bubbly-jumping-at-my-house-a-day-before-her-death

आज "आरुषी" हे पुस्तक वाचून झालं... हे पुस्तक वाचल्यावर आपली न्यायव्यवस्था किती कमकुवत आहे असे म्हणण्यापेक्षा ही केस ज्या प्रकारे हाताळली गेली त्या बद्दल कीव येतेय... राग येतोय... पूर्ण पुस्तक जरी कोणी वाचलं नाही आणि शेवटी ज्या न्यायाधीशांनी तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना दिलेल्या 26 गोष्टीची यादी जरी वाचली तरी ती कोणत्याही सामान्य माणसाला न पटणारी अशीच आहे...

अविरुक सेन यांनी कोणाचेही नावं न बदलता हे पुस्तक जे सत्य समोर दिसतंय त्याप्रमाणेच लिहिलं आहे आणि म्हणूनच पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ते एकदम खरे वाटतं... या खटल्यावेळी अविरुक सेन प्रत्यक्षरीत्या तेथे हजार होते त्यामुळे हरेक गोष्टीचा बारकाव्याने अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे हे वाचताना क्षणोक्षणी जाणवत.

राजेश तलवार यांनी पुस्तकाच्या तिसऱ्या भागात कारागृहात लिहिलेली डायरी ते निर्दोष असल्याची खात्री देते आणि त्यांना किती भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागले हे आपल्याला कळते...  ज्यांना वाटतं की तलवार कुटुंब निर्दोष होतं आणि ज्यांना वाटत दोषी होतं त्या सर्वानीच हे पुस्तक न विसरता वाचा... कारण हे वाचल्यानंतर आजूबाजूला घडणारी घटना जशी दिसते जशी दाखवली जाते तशी असेलच असे नाही असे आपल्याला कळू लागते आणि त्यावर आपलं मत आपण सहजासहजी कोणासमोर पण व्यक्त करताना, एखादे भाष्य करताना 10 वेळा तरी विचार करू इतकं नक्की...

मी हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर काही दिवसातच तलवार कुटुंबाविरुद्ध आवश्यक असे पुरावे नसल्याने त्यांची सुटका करण्यात आली हे वाचनात आले. मनाला खरंच खूप समाधान वाटले... पण याचबरोबर मनात विचार आला त्यांची गेलेली 9 वर्ष त्यांना परत मिळू शकतात का? खरे गुन्हेगार कधी सापडतील का? समाजात तलवार कुटुंबाला आधीचे स्थान आणि मान पुन्हा मिळेल? आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांची लाडकी, त्यांना जिवाहून प्रिय असलेली त्यांची आरुषी त्यांना परत मिळू शकते का? या केस मध्ये अनैतिक संबंध, बलात्कार असे बरेच आरोप प्रत्यारोप आलेत... पण तलवार परिवारावर न कळत सर्वांनीच मग ती सीबीआय असो, मीडिया असो किंवा सामान्य जनता असो लाखो वेळा तो केलाय.

ज्याला कोणाला सत्य जाणून घ्यायचे असेल त्यांनी नक्की " आरुषी" हे पुस्तक वाचा...

No comments:

Post a Comment