Tuesday, June 26, 2012

स्वप्नांची घरटी

"सर्वात जवळची माणसंच जास्त तर्हेवाईकपणाने वागतात, त्यांचं आपण मुळीच मनाला लाऊन घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्याचं सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षा भंगाचं दुःख निर्माणच होत नाही." - व. पु. काळे

वाह!... फक्त ३ ओळी... पण खरचं या ३ ओळी जर खऱ्या आयुष्यात आत्मसात केल्या ना तर आपल्या रोजच्या जगण्यातल जवळजवळ ९०% दुखः नाहीसं होईल... बाहेरचे आपल्याबद्दल वाईट बोलतात त्याहीपेक्षा आपल्या घरातले आपल्या बद्दल वाईट बोलले तर त्याचं दुखः जास्त मोठ असतं आणि जर ती गोष्ट आपण मनाला लावून नाही घेतली तर बाहेरचे जग आपल्याला काही बोलो आपल त्याच्याकडे लक्ष जाणार नाही...

प्रत्येकाच्या आयुष्यात ध्येय असतात लाखो स्वप्न असतात ती पूर्ण झाली नाही म्हणून काय कोणी जगण सोडून देत? मनात आलं तरी तस कोणी करू शकणार नाही... कारण स्वप्न पाहण्याचा अधिकार आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे एक स्वप्न जरी पूर्ण झाले नाही तरी त्या मागोमाग दुसरे स्वप्न साकारण्यासाठी आपण नेहेमी सज्ज असतो... 

स्वप्नांबद्दल मी इकडे मुद्दामच बोललो कारण आपल्या स्वप्नांना बेड्या नसतात ती मुक्त पाखरा सारखी कुठेही विहार करतात... पण अशावेळी त्या स्वप्नांच्या आड न कळत काही अशा व्यक्ती येतात ज्या आपल्या सोबत होतील, आपली साथ देतील असा आपला आंधळा विश्वास असतो... त्यात आपले आईवडील, आपले नातेवाईक आपले मित्र किंवा आपला जीवनसाथी कोणीही असू शकते... आणि जेव्हा त्यांचा विरोध आहे असे दिसून येते तेव्हा आपण हतबल होतो, आपला आत्मविश्वास डळमळतो... अशावेळी काय करायचे कसे वागायचे?... पुढे जायचे की नाही? हरलो तर पडलो तर? या आणि अशा लाखो प्रश्न आपल्याला पडतात... या चक्रव्युहातून जर आपण स्वतःला तारू शकलो तर आपल्याला आपली स्वप्न साकारण्यापासून कोणीच रोखू शकत नाही...

जिद्द आणि चिकाटी अंगी उतरवून ध्येय गाठायचं... आपल्या माणसाचं मनाला मुळीच लागू न घेता त्याचा सकारात्मक विचार करायचा... चांगलं काम करताना खूप अडचणींवर मात करावी लागते खूप कष्ट सोसावे लागतात... दुखांच्या आगीतून स्वतःला तारावे लागते पण त्यानंतर मिळणार समाधान या सर्व गोष्टीवर हलकेच फुंकर घालते... 

आपण जे वाचतो, जे पाहतो, जे ऐकतो... त्याचा नकळत आपल्या मनावर थोडा का होईना परिणाम होतच असतो... म्हणूनच व. पुच्या या ३ ओळी मनाच्या कप्यात कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न करुया आणि स्वप्नांची नवनवी घरटी बांधूया...


No comments:

Post a Comment