Monday, June 18, 2012

शोध स्वतःचा...

स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं?

विचार करत रहायचं?...
स्वतःला आरशात पहायचं?...
की इतरांसारख मुखवटा लावून गल्लोगल्ली फिरायचं?...

स्वतःचा शोध घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं?


जीवनाच्या वाटेवर हा प्रश्न आपली पाठ काही सोडत नाही... तो आपल्या सोबत कायम सावलीसारखा असतो...

कधी दुखः डोंगराएवढ असत.. कधी आत्मसन्मान दुखावला जातो... तर कधी आपला वाटणारा माणूसच आपल्या पाठीत नकळत खंजीर खुपसतो... आणि मग आपण कोण आहोत? आपल्या सोबतच अस का घडतं? आपलं काय चुकल... याची बेरीज वजाबाकी आपण करतो... आणि मग स्वतःचा शोध घेण्याचा फसवा प्रयत्न नेहेमी करत राहतो...


अशावेळी नक्की कसं वागायचं?... काय करायचं? हे आपल्याला समजत नाही... आपण त्या द्वेषात नको ते करून बसण्याची शक्यता अधिक दाट असते...
हे कसं टाळता येईल?
स्वतःचा... स्वतःच्या अस्तित्वाचा शोध कसा घेता येईल?

आपण केलेल्या चुका तर आपल्याला टाळता आल्या नाहीत पण त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय करावं?... याचा विचार नक्कीच आपण करू शकतो...

आणि या सर्वासाठी एक अशी व्यक्ती हवी ज्याला आपण तो सन्मान बहाल करू... त्या व्यक्तीवर विश्वास आणि श्रद्धा ठेवू...मग तो आपला मित्र असेल... आपले आई वडील असतील... शिक्षक किंवा गुरु असतील...

त्यावेळी मात्र त्या व्यक्तीच सार काही ऐकून त्यावर विचारमंथन करण्याची गरज नितांत गरज असते... त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध ही असतील पण त्या आपल्या भल्याच्याच असतील यावर विश्वास हवा... भगवान श्री कृष्णानी सुद्धा जेव्हा अर्जुनाचा रथ कुरुक्षेत्रावर नेला तेव्हा समोर आपले नातेवाईक आपल्या विरुद्ध लढाईला उभे आहेत हे पाहून अर्जुन सुद्धा काही क्षणांसाठी चलबिचल झाला होता आपलेही असे होऊ शकते... पण भगवंतावर असलेल्या भक्ती आणि श्रद्धे कारणच तो भगवतगीते सारखा महान उपदेश ऐकू शकला... आणि त्याला त्याचा मार्ग गवसला...

शरण गेल्याशिवाय जीवन वा मरण उमगणार नाही...

आज जरी पैसा माणसाजवळ असला तरीही आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं?... कोणत्या गोष्टीची आपल्याला जास्तीत जास्त गरज आहे?... आणि याही पेक्षा महत्वाचे म्हणजे आपल्याला नक्की काय कमवायचंय याचा शोध घ्यायला हवा...

प्रश्नाला उत्तर असत आणि सुरुवातीला शेवट...
आपल्या हातात एकच आहे...
शेवट गोड कसा होईल याचा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत रहायचं...

No comments:

Post a Comment